अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
अलिबाग नगराध्यक्ष निवडणुकीत अक्षया नाईक यांच्या नावाच्या अचानक झालेल्या घोषणेनं राजकीय वातावरण अक्षरशः उलथून टाकलं आहे. महिलांसाठी राखीव झालेल्या या पदासाठी अनेक पक्षांत उमेदवारांची धावपळ सुरू होती. राष्ट्रवादीकडून अॅड. कविता ठाकूर, भाजपकडून वर्षा शेठ आणि शेकापमध्ये अॅड. मानसी म्हात्रे यांची चर्चा जोरात होती. पण शेकापने अचानक माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांना उमेदवारी दिल्यानं सगळ्या समीकरणांचा खेळच बिघडला.शेकापने केवळ नगराध्यक्ष नव्हे, तर 20 नगरसेवक पदांसाठीचे उमेदवारही जाहीर करून थेट महायुतीला कोपऱ्यात उभं केलं आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमधील इच्छूक महिलांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. याउलट महायुतीचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतोय. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अजूनही एकतर्फी उमेदवार निश्चित करू शकलेले नाहीत. नगरसेवक पदांसाठीही इच्छूक मिळत नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.. दरम्यान, ठाकरे गटात नाराजीचं वादळ. काही इच्छूक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, त्यांना महायुतीकडून थेट नगरसेवक + नगराध्यक्षपदाच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही नेते डळमळीत, तर काही पक्ष गोंधळात आणि सगळ्यांच्या नजरा आता शेकापच्या पुढील डावावर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय…

