श्रीवर्धन काँग्रेसचा पुनरुज्जीवन प्रवास सुरू; उमेदवारांना AB फॉर्मचे वितरण…

0
38

रायगड शिवसत्ता टाईम्स (नरेश पाटील):-

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक 2025 च्या निवडणुकीत एकेकाळी भक्कम अस्तित्व असलेली काँग्रेस पक्ष पुन्हा संपूर्ण ताकदीने उतरणार असून, यावेळी महाविकास आघाडीसह थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. दीर्घकाळानंतर परंपरागत प्रभाव पुनर्स्थापित करण्याच्या उद्दिष्टाने काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून, याला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष मा. राजाभाऊ ठाकूर यांनी थेट पाठींबा दर्शवून उमेदवारांना बळ दिले आहे. गुरुवारी माणगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षा व रायगड निरीक्षक सौ. राणी अग्रवाल यांनी उमेदवारांना AB फॉर्मचे अधिकृत वितरण केले तसेच निवडून आल्यानंतर पक्षनिष्ठ राहण्याची हमी उमेदवारांकडून घेतली.

श्रीवर्धन तालुक्यातून जाहीर केलेल्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांमध्ये इम्तियाज जियाउल्हुदा कोकाटे (प्रभाग क्र. 8 ब), मुजम्मिल मुख्तार टोलकर (प्रभाग क्र. 6 ब) आणि सौ. संघवी अभिजित पेडणेकर (प्रभाग क्र. 8 अ) यांचा समावेश आहे. या प्रक्रियेदरम्यान तालुकाध्यक्ष सादिक अली राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील निवडणूक समितीतील पदाधिकारी अब्रार काळोखे, मनोज जाधव व दिनेश खैरे हे उपस्थित होते. पार्टीच्या उमेदवारांना मिळालेल्या या सर्वसमावेशक समर्थनामुळे महाविकास आघाडीच्या बळावर काँग्रेसचा विजयाचा आत्मविश्वास आणखी दृढ झाल्याचे स्थानिक राजकीय गणित सूचित करते.

सोमवार, दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असून, या दिवशी महाविकास आघाडी व काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्व तयारीदरम्यान मा. राजाभाऊ ठाकूर यांनी उमेदवारांना दिलेला मजबूत पाठिंबा आणि त्यांच्या विजयासाठी केलेल्या सततच्या सक्रिय प्रयत्नांमुळे पक्षकार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या या मोठ्या हालचालीमुळे श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.