रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना खोचक टोला लागवालय.हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोलणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लावून पाहिली, दुर्बीण लावूनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही,अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय. महाडमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला. सुनील तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत आमच्यासमोर खूप अजेंडे आहेत. गेली चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाही. मी अनेकांचे वक्तव्य ऐकतो की, महाड शहरात काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला. शहरामध्ये मी फिरलो. दुर्बिण लावून बघितले. जाड भिंगाचा चष्मा लावला. पण मला तसं काही कुठे दिसले नाही. प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था पाहिली. ते पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड? अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळत आहे. महाड शहरात अनेक विकास कामे रखडली असून यावर बोलायला खूप वेळ आहे, असे म्हणत तटकरेंनी मंत्री भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतला. आता सुनील तटकरे यांच्या टीकेवर भरत गोगावले नेमका काय पलटवार करणार? हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

