अलिबागमध्ये तिरंगी रणधुमाळी…शेकाप,भाजप,उद्धवसेना आमनेसामने येणार… अलिबागकर सज्ज! इतिहासातील सर्वात जोरदार,रोमहर्षक निवडणूक पेटली…

0
2

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात यंदा इतिहासात कधी नव्हे इतका विस्फोटक माहोल तयार झाला आहे. शेकापने आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने मोठा स्फोट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांना थेट पक्षप्रवेश देऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. पेरेकरांचा हा अचानक पलटवार अलिबागच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा ठरला आहे.

महाविकास आघाडीत शेकाप ‘मोठा भाऊ’ म्हणून काँग्रेसला सोबत घेत जोरदार तयारीत आहे. काँग्रेसला दोन जागा देत त्यांनी आपली मोट मजबूत ठेवली. मात्र या मोटेतून उद्धवसेनेला सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने उद्धवसेनेने स्वतंत्र लढत देण्याची घोषणा केली. त्यांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची नावे पुढील २४ तासांत जाहीर होणार आहेत.

भाजपमध्येही पेरेकरांच्या उमेदवारीमुळे मोठी खळबळ आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना वळसा घालत बाहेरून आलेल्या नेत्या पेरेकरांना तिकीट देण्यात आले, यामुळे भाजपचेच कार्यकर्ते असंतोष व्यक्त करत आहेत. पण वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे पेरेकरांना पक्षाचे पूर्ण पाठबळ मिळणार हे स्पष्ट आहे.

शेकापकडून अक्षया नाईक या तरुण नेत्या पुढे आणल्याने नव्या नेतृत्वाला ताकद मिळाली आहे. नाईक कुटुंबाचा प्रभाव, संघटनशक्ती आणि काँग्रेसची जोड यामुळे शेकापचे समीकरण भक्कम दिसते.आता खरी रंगत आहे ती उद्धवसेनेच्या स्वतंत्र लढ्यामुळे. त्यांचा मजबूत मतदार वर्ग तिरंगी लढतीला आणखी धार देणार आहे.

एकीकडे शेकापचा जुना दबदबा, दुसरीकडे भाजपचा आक्रमक डाव आणि तिसरीकडे उद्धवसेनेची स्वबळावरची उभी लढत – अलिबागमध्ये यंदाची निवडणूक अक्षरशः राजकीय रणांगण बनली आहे.तनुजा पेरेकर विरुद्ध अक्षया नाईक – आणि तिसऱ्या फ्रंटवर उद्धवसेना!अलिबागमध्ये निवडणुकीची सर्वात चुरशीची तिरंगी लढत पेटली आहे!