रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत शेकाप–काँग्रेस आघाडीने पहिल्याच राऊंडमध्ये युतीचा खेळ बिघडवला आहे. प्रभाग क्रमांक 2-ब मधून शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे धडाक्यात बिनविरोध निवडून आले. भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी अचानक नामनिर्देशन मागे घेतल्याने आघाडीला अनपेक्षित पण प्रचंड मोठा फायदा मिळाला.या बिनविरोध विजयाने शेकाप आघाडीत उत्साहाचा स्फोट झाला.शेतकरी भवन येथे कार्यकर्त्यांची गर्दी उसळली, फटाके, जल्लोष, घोषणा आघाडीने विजयाचा झेंडा उंचावला.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, नगरसेवक उमेदवार अॅड. मानसी म्हात्रे आणि इतर नेत्यांची उपस्थिती आघाडीच्या एकजुटीची जाहीर घोषणा ठरली.हा विजय केवळ एक प्रभागाचा नाही… आघाडीच्या ‘सत्ता-आराखड्याचा’ पहिला ठोस इशारा आहे. 2-ब मधील बिनविरोध निकालाने आघाडीने युतीच्या गोट्यात मानसिक धक्का दिला असून, आगामी लढतींचे समीकरण डळमळीत झाले आहे.अलिबागमध्ये 2 डिसेंबरला मतदान होणार असून शेकाप–काँग्रेस विरुद्ध भाजप–शिवसेना (शिंदे गट) अशी थेट टक्कर आहे.मात्र प्रभाग 2-ब मधील बिनविरोध निकालाने आघाडी आघाडीवर.. युती बचावात अशी स्थिती निर्माण झाली आहे. 21 नोव्हेंबरनंतर अंतिम याद्या निघतील आणि खरी लढाई स्पष्ट होईल,पण सध्यातरी परिस्थिती एकच सांगते अलिबागमधील सत्ता कुठे झुकणार ? शेकापने पहिल्याच डावात बोर्ड हलवून टाकले! शहरातील राजकीय वातावरण आता अधिक उत्सुकतेने पाहिले जात असून, मतदानपूर्वीच्या रणनीती आणि प्रभागातील मतदारांची पसंती निवडणुकीच्या निकालावर ठराविक परिणाम करणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. या घटनाक्रमामुळे अलिबागमध्ये राजकीय रंगत आणि उत्सुकता वाढली असून, नगरपरिषदेतील पुढील सत्ता समीकरण कोणाकडे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

