उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
भाजपने नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण येथे प्रचारासाठी उर्दू भाषेत -पत्रक छापले आहे.यावरून आता राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच रंगले असून भिवंडीचे आमदार रईस शेख, एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण आणि मनसेचे प्रवक्ते योगश चिले यांनी भाजपावर चांगलीच कडाडून टीका केली आहे. हेच ते भाजपचे कट्टर हिंदुत्व असे म्हणत मनसेने टीका केली आहे. तर या पत्रकाबाबत आता भाजपचे नितेश राणे काय भूमिका घेतात अशी टीका आमदार रईस शेख यांनी केली आहे. तसेच एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी देखील बदलता है रंग आसमान कैसे कैसे असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. उरण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारासाठी उर्दू भाषेत पत्रक प्रसिद्ध केले आहे. यावरून सर्वत्र एक नवे वादंग पाहायला मिळाले आहे. परंपरागतपणे हिंदुत्ववादी छाप जोपासणाऱ्या भाजपकडून अल्पसंख्याक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उर्दूमधील पत्रकाचा वापर हे भाजपच्या विरोधकांसाठी एक आयते कोलीत आहे. यावरून भाजपावर सर्वत्र टीका केली जात आहे. भिवंडीचे आमदार रईस शेख, एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण, तर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. हिंदुत्वाचा झेंडा उंचावणाऱ्या भाजपला अल्पसंख्याक मतांसाठी उर्दूचा आधार घ्यावा लागणे हे त्यांच्या भूमिकेतील मोठे राजकीय नामुष्की असल्याचा प्रत्यक्ष आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मनसेने तर ही संपूर्ण घटना थेट भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला आव्हान देणारी ठरवली आहे. “हेच ते भाजपचे कट्टर हिंदुत्व?” एकीकडे सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या, हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात भडकवायच… दुसरीकडे मुस्लिम मतांसाठी उर्दूत पत्रके छापायची, मदरस्यांना निधी दयायचा… अशी कडवट टीका मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केली आहे. तर भाजपाने आता उर्दू मध्ये प्रचार सुरु केला असून याबाबत भाजपचे नितेश राणे काय भूमिका घेतात, असा टोला आमदार रईस शेख यांनी लगावला आहे. तर याबाबत अद्याप तरी उरण भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

