श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
आगामी श्रीवर्धन नगरपरिषद २०२५ सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास श्रीवर्धन तालुका काँग्रेसचे खजिनदार व वरिष्ठ नेते श्री. अब्रार काळोखे यांनी व्यक्त केला. काँग्रेस उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, श्रीवर्धन ही काँग्रेस पक्षाची भक्कम किल्ले मानली जाणारी जागा असून या परिसरात काँग्रेसने सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली आहे. “इतिहास पुनरुज्जीवित होणार असून, काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणार हे निश्चित आहे,” असेही काळोखे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
श्री. अब्रार काळोखे हे काँग्रेसचे निष्ठावान, बलाढ्य आणि सातत्याने कार्यरत राहिलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वतःच्या निवासस्थानाचा एक भाग काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून देत नियमित बैठका, नियोजन, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच पक्षाच्या उपक्रमांचे केंद्र म्हणून दिला आहे… ही बाब त्यांच्या पक्षनिष्ठतेचे उदाहरण मानली जात आहे.
श्रीवर्धन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सादिकभाई राऊत यांच्या सहकार्याने श्री. काळोखे यांनी अधिकृत काँग्रेस चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच काँग्रेसच्या रायगड जिल्हा कमिटीपासून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यंत हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर उपाध्यक्ष व रायगड जिल्ह्याच्या प्रभारी सौ. राणी अग्रवाल यांच्याकडून माणगावतील काँग्रेस कार्यालयात एबी फॉर्मचे वितरण काँग्रेसच्या उमेदवारांना करण्यात आले, या वेळी श्री. काळोखे उपस्थित होते.
काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या अधिकृत उमेदवारांना तिकीट मिळाल्याने उत्साहाने भारावले असून, संपूर्ण संघटना जोरदार पद्धतीने निवडणूक लढविण्यास सज्ज झाली आहे. श्री. अब्रार काळोखे आणि त्यांची टीम प्रत्येक बूथवर, प्रत्येक विभागात जोरदार अशा निर्धाराने काम करत असल्याची माहिती ही समोर आली आहे.
ते शेवटी म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपल्या आघाडीतील मित्रपक्षांसह निवडणूक मैदानात उतरला आहे. घराघरांत संपर्क मोहीम सुरू झाली असून, लवकरच महाविकास आघाडी चे एक भव्य प्रचारसभा, रॅली आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे ही त्यांनी अंती सांगितले.

