रायगडमध्ये नगरपरिषदेची सत्ता कुणाची?तटकरेंचा दबदबा की गोगावलेंचा चमत्कार?… रायगडच्या नगरपरिषदांवर राष्ट्रवादी,भाजप आणि शेकापची ‘टोटल पॉवर…  

0
28

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीने रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ केली आहे. ही निवडणूक फक्त मतदान प्रक्रिया नसून,अनेक दशकांच्या राजकीय प्रभावाचा आणि नेत्यांच्या करिष्म्याचा कस पाहणारी ठरली आहे.राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार, रायगडची राजकीय दिशा स्पष्टपणे बदलत आहे.या संपूर्ण निवडणुकीत खासदार सुनील तटकरे हे सर्वात मोठे आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.महाडपासून माथेरानपर्यंत आणि रोह्यापासून उरणपर्यंत तटकरे यांची कार्यकर्त्यांवरील पकड आणि त्यांची जबरदस्त संघटनशक्ती यामुळे जिल्ह्यात ‘तटकरे लाट’ स्पष्टपणे जाणवत आहे. राजकीय जाणकार स्पष्टपणे सांगत आहेत,तटकरे यांनी केवळ प्रचार केला नाही, तर संपूर्ण निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली उभी केली.याचा परिणाम म्हणून,राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप युतीकडे ७ नगरपरिषदांचा कौल झुकत असल्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत.

मंत्री भरत गोगावले,आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) यांची लढाईही कमी नव्हती.गोगावले यांनी महाड-श्रीवर्धनमध्ये,तर दळवी यांनी अलिबाग-पेणमध्ये रणशिंग फुंकले होते.त्यांचे प्रयत्न प्रखर असले तरी, राष्ट्रवादी-भाजप युती थोडी वरचढ ठरल्याचे चित्र आहे.शिवसेनेची पकड २ नगरपरिषदांपर्यंत घट्ट राहील,असा अंदाज आहे.

रायगडची सर्वात संवेदनशील आणि प्रतिष्ठेची निवडणूक म्हणजे महाड नगरपरिषद. येथील निकाल थेट खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करेल. महाडचा निकालच रायगडच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहे.अलिबाग नगरपरिषदेत शेकापचा प्रभाव कायम असल्याचे संकेत आहेत. तसेच,अनेक ठिकाणी झालेली अंतर्गत भांडणे आणि स्थानिक मुद्द्यांमुळे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.निकालानंतर गरज पडल्यास राष्ट्रवादी,भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुती’चे एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नगराध्यक्ष आणि सत्ता कोणाची, हे निकालानंतरही बदलू शकते.शेवटी, रायगडच्या जनतेचा कौल तटकरे यांच्या प्रभावाला अधिक बळ देत असल्याचे दिसत असले तरी, हा जिल्हा नेहमी शेवटच्या क्षणी निर्णय बदलणारा राहिला आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय असेल, यासाठी प्रतीक्षा करावी लागेल!परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक चुरशीची, प्रतिष्ठेची आणि सत्ता निश्चित करणारी निवडणूक आहे.