महेश बालदी यांच्या विरोधात बोलला म्हणून मनसे पदाधिकाऱ्याला भरचौकात मारहाण… सतीश पाटील यांना मारहाण करून जबरदस्तीने माफी मागायला लावली…

0
27

 उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-

उरण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)चे पदाधिकारी सतीश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश बालदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या रागातून बालदीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पाटील यांना मारहाण केली असून,त्यांच्यावर दमदाटी करून जबरदस्तीने माफी मागायला लावल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

लोकशाहीत निवडणुकीदरम्यान टीका-टिप्पणी करणे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचा अधिकार असतो.मात्र,उरणमध्ये ‘बालदी’ यांच्या चिन्हाविरोधात वक्तव्य करणे मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांच्यासाठी महागात पडले…मिळालेल्या माहितीनुसार,चिन्हाचा प्रचार करणाऱ्या समर्थकांकडून राजकीय द्वेषातून सतीश पाटील यांना घेरण्यात आले.या कार्यकर्त्यांनी पाटील यांना धमकावले, शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केली.सर्वात गंभीर बाब म्हणजे, मारहाणीनंतर पाटील यांना दमदाटी करून, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जबरदस्तीने माफी मागायला लावली आहे.त्यानंतर सतीशच्या आईला देखील मारहाण केल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली..
राजकीय विरोधकांना सत्तेच्या बळावर आणि गुंडगिरीच्या माध्यमातून दाबण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे दहशत निर्माण करणे हे लोकशाही मूल्यांचे सरळसरळ उल्लंघन आहे.या हल्ल्यामुळे उरणच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली असून,मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.शांत आणि निर्भीडपणे निवडणूक लढवण्याच्या वातावरणाला ‘बालदीच्या समर्थकांनी गुंडगिरीच्या माध्यमातून सुरुंग लावला आहे,असा स्पष्ट आरोप मनसेकडून केला जात आहे.

सतीश पाटील यांना मारहाण करणाऱ्या आणि दमदाटीने माफी मागायला लावणाऱ्या गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्यावतीने भावना घाणेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन,हल्लेखोरांवर ‘गुंडगिरीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या घटनेमुळे उरण नगरपालिकेची निवडणूक आता केवळ मतांची लढाई न राहता,लोकशाही विरुद्ध गुंडगिरी अशी निर्णायक लढाई बनली आहे.