रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे – प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांची ठाम मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अशी ठाम व आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दिनांक २२ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या जनआंदोलनास काँग्रेस पक्षातर्फे भूमिपुत्रांना संपूर्ण व बिनशर्त पाठिंबा दिला जाईल. तसेच, भाजपाने या नामकरणास विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व उपाध्यक्ष आर. सी. घरत, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, ज्येष्ठ काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महासचिव मिलिंद पाडगावकर तसेच मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पार्श्वभूमीवर, या नामकरणाच्या लढ्यात काँग्रेस पक्षाने सक्रिय सहभाग घ्यावा व भूमिपुत्रांच्या न्याय्य मागणीस भक्कम सहकार्य करावे, यासाठी माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव व काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याकडे आग्रहपूर्वक विनंती केली होती. त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत काँग्रेस नेतृत्वाने हा विषय राज्यपातळीवर उचलून धरला असून, शुक्रवारी झालेली पत्रकार परिषद ही त्याच निर्णायक भूमिकेची ठोस साक्ष ठरली आहे.
या दरम्यान लोकनेते दि. बा. पाटील हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सिडकोच्या विकासासाठी आपली पिढीजात जमीन देणाऱ्या शेतकरी, कष्टकरी व मच्छीमारांच्या हक्कांसाठी अविरत लढणारे जनआंदोलनाचे अग्रदूत होते. विकासाच्या नावाखाली भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांनी सत्ता, प्रशासन व व्यवस्थेशी निर्भीड संघर्ष केला आणि शेवटपर्यंत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून, भूमिपुत्रांच्या त्यागाला दिलेली ऐतिहासिक मानवंदना, कृतज्ञतेची भावना आणि सामाजिक न्यायाची अपरिहार्य मागणी आहे.

