खोट्या आश्वासनांचा भांडाफोड…चौलमध्ये विरोधकांवर घणाघाती हल्लाबोल…

0
2

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल–तुलाडदेवी येथे रविवारी घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीने संपूर्ण जिल्हापरिषद मतदार संघाने लक्ष वेधून घेतले.या बैठकीला जनतेची तोबा गर्दी पाहायला मिळाली. ही अभूतपूर्व उपस्थिती म्हणजे सुरेंद्र म्हात्रे यांची वाढती लोकप्रियता असून, हीच गर्दी पाहून विरोधकांची झोप उडणे अटळ आहे, असे ठाम वक्तव्य सुरेंद्र म्हात्रे यांनी केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेस तालुका प्रमुख भास्कर चव्हाण, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते
तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाषणात बोलताना सुरेंद्र म्हात्रे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दांत हल्लाबोल केला. खोटी आश्वासने, आधीच झालेली कामे नव्याने दाखवून जनतेची दिशाभूल, ३०० कोटींच्या निधीचे हवेतले दावे करून जनतेला स्वप्ने दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.पैशांचा महापूर दाखवून फोडाफोडीचे राजकारण, खोटी टेंडरिंग आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचे सांगत, ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कोविड महामारी आणि निसर्ग चक्रीवादळात चौल परिसराचे शंभर टक्के नुकसान झाले होते. त्या कठीण काळात आमदार आणि विरोधक कुठे होते? असा थेट सवाल करत, ती वेळ जनता विसरलेली नाही, अशी घणाघाती टीका सुरेंद्र म्हात्रे यांनी केली.दरम्यान,

बैठकीत बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका मांडली.“टक्केवारीत काम करणारे आम्हाला नकोत. आजपर्यंत संबंधित आमदाराने विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत,” असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर गद्दारांना गाडावेच लागेल. सुरेंद्र म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून देणे हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगत, ते फक्त शिवसेनेचे नव्हे, तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचेही उमेदवार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.चौलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीने निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांसमोरचे आव्हान अधिकच कठीण होत असल्याचे चित्र आहे