२६ जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावरून ‘मराठी सन्मान यात्रा’ची प्रेरणादायी सुरुवात… 

0
2

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

मराठी भाषेच्या सन्मानासाठी युवा समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव (सीमाभाग) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘मराठी सन्मान यात्रा’ येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी प्रेरणास्थान असलेल्या रायगड किल्ल्यावर भेट देऊन पुढील आंदोलनासाठी दिशा घेणार आहे.

ही माहिती युवा समितीचे नेतृत्व करणारे व अध्यक्ष श्री. शुभम शेळके यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी हा पुढाकार घेण्यात आला असून महाराष्ट्र एकीकरण समिती ही संघटना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गेल्या सुमारे ७ दशकांपासून बेळगाव शहरासह व बेळगाव सीमाभागातील सुमारे 865 हून अधिक मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी सातत्याने लढा देत आहे.

श्री. शेळके यांनी सांगितले की, यात्रा सहभागी कार्यकर्ते २४ जानेवारी रोजी बेळगावातून रायगडाकडे रवाना होतील व २५ जानेवारीच्या रात्री उशिरा रायगड किल्ल्याजवळील हिरकणीवाडी येथे पोहोचतील. त्यानंतर २६ जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात येईल, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले जातील तसेच रायगडाची पवित्र माती घेऊन कार्यकर्ते पुन्हा बेळगाव कडे परततील.

रायगड भेटीनंतर १ फेब्रुवारी २०२६, रविवारपासून बेळगाव सीमेवरून अधिकृतपणे ‘मराठी सन्मान यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही यात्रा रायगडावरून सुरू होणार नसून बेळगावतूनच सुरू होईल, मात्र रायगडावर जाऊन प्रेरणा व ऊर्जा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

२६ जानेवारी हा संपूर्ण देशभर साजरा होणारा प्रजासत्ताक दिन असल्याने, त्या दिवशी त्याची महत्व आणि रायगडासारख्या ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळावर जाऊन शक्ती मिळावी या हेतूने ही तारीख निवडल्याचेही श्री. शेळके यांनी नमूद केले व त्यावर सविस्तर माहिती ही दिले.

दरम्यान, सीमाभाग बेळगाव येतुन रायगड किल्ल्यावर जाण्यास इच्छुक असलेल्या सर्व मराठीप्रेमींनी २० जानेवारी २०२६ पर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करत या यात्रेला पाठिंबा देऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन अंती श्री. शेळके यांनी केले आहे.

या मोहिमेला रायगड जिल्ह्यातुन व परिसरातून सदर ज्या नागरिकांना किंवा संघटना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांनी सदरदिनी रायगड किल्लावर उपस्थिती राहण्याचे किंवा युवा समिती सीमाभाग बेळगाव चे कार्याध्यक्ष श्री. धनंजय पाटील मोबाईल क्रमांक ७८९९०९४१०८  (बेळगाव) संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.