कृषिधन : कृषी विज्ञान – हवामान- तंत्रज्ञान प्रदर्शनीचे…महाड येथे ३० व ३१ जानेवारी रोजी भव्य आयोजन… 

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाड दि. २७ महाड येथील श्री विरेश्वर देवस्थान परिसरात दि. ३० व ३१ जानेवारी  रोजी “कृषिधन : कृषी विज्ञान – हवामान -तंत्रज्ञान प्रदर्शन २०२६” या महत्त्वपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी, विज्ञान, हवामान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारे हे प्रदर्शन शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व कृषी उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

या प्रदर्शनात कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विज्ञान शिक्षक, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्योग प्रतिनिधी एकत्र येणार असून, नवीन कृषी तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती, हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम, कृषी उद्योगातील बदलत्या संधी, तसेच कृषी विकासात हवामान अंदाजाचे महत्त्व या विषयांवर परिसंवाद व सखोल चर्चा होणार आहेत.

यासोबतच महाडमध्ये उपलब्ध कृषी संलग्न अभ्यासक्रम, उच्च शिक्षण व करिअर संधी यावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञानाधिष्ठित मॉडेल्स आकर्षणाचे केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी व फूड टेक्नॉलॉजी, महाड येथील विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी पर्यटन, मातीविना शेती, उभी शेती, सेंद्रिय शेती, एकात्म शेती पद्धती, सौर ऊर्जा सिंचन, हरितगृह, पर्जन्यजल साठवण, कंपोस्ट व गांडूळ खत, अन्न कचरा व्यवस्थापन, अन्न पॅकेजिंग, द्राक्ष वाईन उत्पादन, मानवी व वनस्पती पेशी, न्यूरॉन, क्लोरोप्लास्ट, कोरोना विषाणू, आरोग्य व स्वच्छता आदी विषयांचा समावेश  असणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात डॉ. विद्याधर वैद्य (कृषी हवामान शास्त्र विभाग, आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात) तसेच अनुभवकुशल औद्योगिक व्यवस्थापक व समाजाभीमुख रोटेरिअन सुरेश भोसले यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभणार आहे. तर  प्रदर्शनीचे   उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरु  डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ.संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर,पं. स. गटविकास अधिकारी  उदयसिह साळूंखे, गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे, कृषी अधिकारी धीरज तोरणे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे आपत्कालीन व्यवस्थापन संचालक रोटे. डॉ. राजीव गोखले, भारतीय किसान संघ चे जिल्हाध्यक्ष प्रमोद लांगी, श्री विरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष दिपक वारंगे, रोटे. डॉ. अमोल तांगडे, महाड विज्ञान गणित मंडळ चे यासिन पोशीलकर, समी परकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर हे असतील.फार्म फ्रेश विक्री व विशेष उपक्रम प्रदर्शनादरम्यान कृषी महाविद्यालय फार्ममधील ताजा भाजीपाला, कंपोस्ट खत, पशुखाद्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. यावेळी “फार्म फ्रेश व्हेजी बॅग” चे लोकार्पण होणार असून, ही भाजीपाला बॅग दर आठवड्याला महाडकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्वांसाठी उपयुक्त उपक्रम  प्रदर्शनीच्या परिसरास “डॉ. बाळासाहेब सावंत विज्ञान नगरी” असे नाव देण्यात आले असून,शालेय शिक्षण अधिक अनुभवाधिष्ठित व्हावे, अन्न उत्पादन, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता व संवर्धन यांचे महत्त्व प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी कृषिधन : कृषी विज्ञान – हवामान – तंत्रज्ञान प्रदर्शन 2026 निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर यांनी व्यक्त केला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञान शिक्षक, शेतकरी गट, बचत गट, कृषी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, एफपीओ संचालक व जागरूक नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.