चार महिन्यांपासून पथदिवे बंद साप व मगरी वस्तीमध्ये येत असताना जबाबदारी कुणाची?

0
3

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

प्रभाग क्र. १६ खांदाड येथील राजीपा शाळा परिसरापासून मोर्बा रोडपर्यंत तसेच या मार्गावरील अंतर्गत रस्त्यांवरील अनेक पथदिवे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळापासून बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधारात गेला आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडताना टॉर्च व मोबाईलच्या फ्लॅशलाइटचा आधार घ्यावा लागत असून, ही परिस्थिती अक्षरशः धोक्याची ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मंगळवारी दि. २७ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास खांदाड येथील मराठी शाळा व सार्वजनिक शौचालय परिसरात एक मोठा व लांब धामण (साप) आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अंधारामुळे सुरुवातीला नेमके काय घडते आहे हे कोणालाही समजले नाही. सर्वप्रथम काही लहान मुलांनी साप पाहताच भीतीने आरडाओरडा केला. काही मिनिटांतच गावातील युवक टॉर्च व मोबाईलच्या फ्लॅशलाइटसह घटनास्थळी जमा झाले आणि पूर्ण अंधारात सापावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांच्या मते पथदिवे बंद असल्यामुळे हा संपूर्ण मार्ग, त्यास जोडणारे अंतर्गत रस्ते, मोकळी ठिकाणे व वस्तीतील परिसर अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या अनेक नागरिक रात्रीच्या वेळी हातात टॉर्च किंवा मोबाईलची लाईट घेऊनच ये-जा करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच भागात वस्तीमध्ये, अगदी अंतर्गत रस्त्यांवरही मगरी आढळून आल्या होत्या. त्या घटनांनी प्रशासनाला इशारा दिला असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

आमच्या प्रतिनिधींनी यापूर्वीही नगरपंचायत प्रशासनाला पथदिवे बंद असल्याबाबत अनेक वेळा अवगत केले होते. या दरम्यान २५ डिसेंबर २०२५ रोजी माजी नगराध्यक्ष व सध्याचे नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून पथदिवे लवकरच सुरू केले जातील, अशी माहिती दिली होती. मात्र, पथदिव्यांची उपलब्धता नसल्यामुळे काम रखडले असल्याचे पुढे समोर आले असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

इतक्या मूलभूत सुविधेसाठी इतका मोठा विलंब कसा काय होऊ शकतो? एकीकडे शहराच्या विकासासाठी नगरपंचायतने विविध करांमध्ये वाढ केली आहे, मग पथदिवे हा विकासाचा भाग नाहीत का? नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची नाही का? असे थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना अनेक युवकांनी सांगितले की पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असून तक्रारी करून-करून ते अक्षरशः थकले आहेत. एका संतप्त रहिवाशाने सांगितले की, “पथदिव्यांच्या कामासाठी जबाबदार कर्मचारी फक्त ‘हो, हो, होईल’ असे सांगतात; पण प्रत्यक्षात कधीच दुरुस्ती होत नाही.”

अंधारामुळे शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी तात्काळ राजीपा शाळा ते मोर्बा रोड व सर्व अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे कार्यान्वित करण्याची तसेच संबंधित विभागावर जबाबदारी निश्चित करण्याची जोरदार मागणी केली आहे. खांदाडमधील ही परिस्थिती नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच असेल, असा स्पष्ट इशारा स्थानिकांनी दिला आहे.