रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
सीमावादग्रस्त मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) च्या दीर्घकालीन मागणीला रायगड किल्ल्यावर मोठा जनसमर्थन मिळाले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी २०२६ रोजी युवा समिती सीमाभाग बेळगावच्या वतीने ‘मराठी सन्मान यात्रे’चा शुभारंभ ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर करण्यात आला.
युवा समिती सीमाभाग (एमइएस) चे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेचा पुढील प्रवास सीमावादग्रस्त भागांतील बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर व भालकी येथे होणार आहे. यात्रेच्या भव्य यशासाठी आणि योग्य प्रारंभासाठी शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी २५० हून अधिक कार्यकर्ते, कार्यकारिणी सदस्य व हितचिंतकांनी दोन दिवसांचा रायगड दौरा केला. २६ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एमईएस युवा समितीचा ताफा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या हजारो पर्यटकांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीतो जेल में’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रोपवे प्रवासादरम्यानही एमईएसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मराठी अस्मितेचे प्रभावी दर्शन घडवले.
रायगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांनी एमईएस युवा समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत सात दशकांपासून सुरू असलेल्या सीमावादाच्या लढ्याची माहिती जाणून घेतली. मराठी भाषिक भाग अन्यायकारक पद्धतीने कर्नाटक राज्यात ठेवण्यात आल्याची बाब समजताच अनेकांनी तीव्र आश्चर्य आणि खंत व्यक्त केली.
“या प्रश्नाबाबत आम्हाला आतापर्यंत माहितीच नव्हती. केंद्र व राज्य सरकारांनी इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष केल्याचे दुर्दैवी आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि या लढ्यात सहभागी होऊ,” अशी भूमिका अनेक पर्यटकांनी व्यक्त केली. अनेकांनी किल्ल्यावरच चर्चांमध्ये भाग घेत आपले विचार मांडले आणि आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला.
या प्रसंगामुळे महाराष्ट्र एकींकिरण समितीच्या (एमइएस) दीर्घकालीन मागणीला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून मोठे बळ मिळाले. यावेळी सीमावादाच्या प्रश्नावर ठोस भूमिका न घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारविरोधातही नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली.
एकूणच रायगड किल्ल्यावर घडलेला हा प्रकार जनजागृतीचा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, एमईएस युवा समिती सीमाभागच्या ‘मराठी सन्मान यात्रा’ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. येत्या काळात सीमावादग्रस्त भागांतील मराठी बांधवांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

