२५०० मतांचा दणदणीत विजय; वहूर गणात सौ. प्रेरणा सावंत विजयी हे त्रिकूटच ठरले विजयाचे शिलेदार !

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

वहूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार सौ. प्रेरणा जितेंद्र सावंत यांनी तब्बल २५०० मतांच्या आघाडीसह दणदणीत विजय मिळवला. या विजयामागे काडीपट्ट्यातील “विजयाचे शिलेदार” म्हणून ओळखले जाणारे शांताराम मालप, राजू सकपाल आणि राजेश नवले या त्रिकूटाची निर्णायक भूमिका ठरली.

सौ. प्रेरणा सावंत या दाभोळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावात विकासकामांची गती लक्षणीय वाढली. नळपाणी योजना, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, अंतर्गत गावांमधील संपर्क रस्ते तसेच मूलभूत सुविधा उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या सहकार्याने अनेक प्रलंबित कामांना मार्गी लावण्यात आले.

या निवडणुकीत नामदार भरत शेठ गोगावले यांचे मार्गदर्शन तसेच युवा सेनेचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले यांची प्रेरणा कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरली. स्थानिक पातळीवर शांताराम मालप, राजू सकपाल आणि राजेश नवले यांनी गावागावांत जाऊन जोरदार प्रचार मोहीम राबवली. वाड्या-वस्त्यांवर बैठकांचे आयोजन, घरभेटी आणि विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांनी वातावरण शिवसेनामय केले.

परिणामी, वहूर पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातून सौ. प्रेरणा सावंत यांना मताधिक्य मिळाले आणि २५०० मतांच्या फरकाने त्यांनी विजयाची पताका फडकावली. हा विजय केवळ उमेदवाराचा नसून कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा, संघटनबळाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची भावना मतदारांतून व्यक्त होत आहे. आगामी काळात विकासकामांना अधिक वेग देण्याचा निर्धार सौ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.