माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
“पाणीपुरवठ्यातील गोंधळ थांबवून स्थिरतेकडे वाटचाल होणार का?” हा प्रश्न सध्या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेयजल पुरवठ्यात सातत्याने अनियमितता दिसून येत असून, मूलभूत नागरी सुविधेचा विषय दैनंदिन त्रासाचे कारण ठरत आहे. पूर्वी नियमितपणे दोन तास होणारा पाणीपुरवठा अनेक ठिकाणी अवघ्या दीड तासावर आला आहे. त्यातही पाण्याचा दाब कमी असणे, मध्येच पुरवठा खंडित होणे व पुन्हा सुरू होणे, अचानक वेळ बदलणे, एखादा दिवस पूर्णपणे पाणी न येणे किंवा उशिरा सायंकाळी अथवा रात्री पाणी सोडणे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत आहे.
आठवड्यात किमान दोन ते तीन वेळा वेळापत्रकात बदल होत असल्याचे चित्र आहे. सकाळच्या नियोजित वेळेत पाणी न आल्यास कोणतीही अधिकृत पूर्वसूचना दिली जात नाही. परिणामी नागरिक सोशल मीडियावरील संदेश, व्हॉट्सअॅप गट किंवा शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितींवर अवलंबून राहतात. मात्र या माहितीमध्येही विसंगती आढळते. काहींना संदेश मिळतो, काहींना मिळत नाही; अशा परिस्थितीत फोन, संदेश आणि चौकशी यांची साखळी सुरू राहते.
या संदर्भात काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचणी, मोठ्या गळतीची दुरुस्ती, तसेच वीजपुरवठ्यातील अडथळे अशी कारणे सांगण्यात आली. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संपर्क साधण्यात आला. त्यांनी सातत्याने वीजपुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट करत, पाणीपुरवठ्यातील अनियमिततेसाठी वीज विभागाला जबाबदार धरणे निराधार असल्याचे सांगितले. मागील दोन महिन्यांत केवळ ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी अल्पकाळ वीज खंडित झाली होती, त्याशिवाय कोणतीही मोठी अडचण नोंदलेली नाही.
दरम्यान, न. पं प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना तसेच मुख्य अधिकाऱ्यांना लेखी संदेशाद्वारे परिस्थितीची माहिती देण्यात आली. तथापि, ठोस प्रतिसाद किंवा उपाययोजना दिसून आलेली नाही. शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला. संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. व्हॉट्सअॅप संदेश ‘वाचले’ गेले असले तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
त्या दिवशी पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत विविध अफवा पसरल्या—सकाळी १० वाजता, दुपारी १२ वा., सायंकाळी ४ वा. अशा विविध वेळा सांगण्यात आल्या. दुपारी १२.१५ वाजता पाणी सुरू झाल्याचा संदेश व्हायरल झाला; मात्र प्रत्यक्षात पाणी दुपारी २.२५ वाजता सोडण्यात आले. सकाळपासून वाट पाहून कामावर गेलेल्या नागरिकांना हा पुरवठा चुकला. सायंकाळी येईल या समजुतीने थांबलेल्यांनाही दुपारची संधी मिळाली नाही. पाणी सुरू होताच नागरिकांमध्ये धावपळ उडाली आणि एकमेकांना माहिती देण्यासाठी संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली. काही ठिकाणी पाणी आले असताना शेजारील निवासी संकुलांमध्ये मात्र पुरवठा न झाल्याचेही निदर्शनास आले.
संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांनी रस्ते स्वच्छता, दिवाबत्ती, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकला आहे. अलीकडेच रस्त्यावरील दिव्यांच्या दुरुस्तीच्या काम नगर पंचायत मार्फत सात महिना नंतर हाती घेण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या दरम्यान पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरही सकारात्मक आणि ठोस पावले उचलली जातील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
शेवटी, “पाणीपुरवठ्यातील गोंधळ थांबवून स्थिरतेकडे वाटचाल होणार का?” हा केवळ प्रश्न नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अत्यावश्यक मागणी आहे. नियमित वेळापत्रक, पारदर्शक माहिती आणि जबाबदारीने काम करणारी व्यवस्था निर्माण झाली, तर नागरिकांना दिलासा मिळेल आणि न. पं प्रशासनालाही जनविश्वास संपादन करण्याची सुवर्णसंधी लाभेल.

