महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
आंबेत बसस्थानकाची सध्याची अवस्था पाहता प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षाचा मुद्दा समोर येत आहे. हेच आंबेत गाव म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले यांचं गाव आहे. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असताना आंबेत येथील या बसस्थानकाचं बांधकाम करण्यात आलं होतं. आज मात्र त्याच बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकादायक बनली आहे.
मुंबई – मंडणगड – दापोली या मार्गावरील प्रवासी बस या ठिकाणी नियमित थांबतात. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दोन मोऱ्या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असून, कोणतीही सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या बसस्थानकाची देखभाल आणि दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभाग या दोन्ही विभागांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील बसस्थानकाची ही अवस्था असेल, तर इतर ग्रामीण भागातील सार्वजनिक सुविधांची स्थिती काय असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बसस्थानकाची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

