रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर आज सकाळी अत्यंत भक्तिभावाने मानवंदना देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदासह मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनामुळे व वाद्यवृंदाच्या गजरामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. हा सोहळा अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

