महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
शिरगाव येथील शाळेत प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेची भौतिक व गुणात्मक प्रगती साधण्यासाठी प्रशासनातील मान्यवर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी मा. महेश शितोळे, तहसीलदार, महाड यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर चर्चा केली.
शाळेसाठी क्रीडांगण व सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पालक व माजी विद्यार्थ्यांना सहकार्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मंडळ अधिकारी मा. श्रीमती रितू सुदर्शने, ग्राम महसूल अधिकारी मा. सौ. सुषमा मोरे, ग्रामपंचायत उपसरपंच मा. सौ. सुचिता सागवेकर, शाळा समिती अध्यक्ष मा. श्री रुपेश धामणस्कर, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक वर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रद्धा मांडवकर मॅडम, पदवीधर शिक्षक श्री नवनाथ महाडिक सर, उपशिक्षक श्री सचिन खोपडे सर, उपशिक्षिका सौ. शिला शहा मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन सुंदर खोपडे यांनी उत्कृष्टरीत्या केले. अशाप्रकारे प्रेरणा, मार्गदर्शन आणि सहकार्य यांच्या संगमातून शिरगाव शाळेचा प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न झाला.

