भाजप नेते महादेव कांबळे यांच्या पत्नी संध्या कांबळे यांचे आकस्मिक निधन; रसायनी परिसरात शोककळा…

0
4

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

रसायनी परिसरातील भाजपचे नेते महादेव कांबळे यांच्या सुविद्य पत्नी संध्या कांबळे यांचे रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या अवघ्या ४० वर्षांच्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच रसायनी परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे संध्या कांबळे यांनी अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी पनवेल तालुक्यातील वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध उपक्रमांमधून त्यांनी जनसंपर्क वाढवत लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले होते.

त्यांच्यावर रिस येथील स्मशानभूमीत सोमवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्या कांबळे यांच्या पश्चात पती महादेव कांबळे व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, त्यांचा जलदान विधी, पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हरी ओम पार्क, चांभाली येथे त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.