Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजनवी मुंबईच्या दोन इस्टेट एजंटच्या हत्येचे गूढ उकलले...जमिनीच्या व्यवहाराच्या आर्थिक वादातून हत्येचा कट रचला...

नवी मुंबईच्या दोन इस्टेट एजंटच्या हत्येचे गूढ उकलले…जमिनीच्या व्यवहाराच्या आर्थिक वादातून हत्येचा कट रचला…

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स  (वार्ताहर ) :- 

रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या दोन दलालांच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे…जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले असून यातील एक मृत दलाल सुमित जैन यानेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दलालाच्या हत्येनंतर सुपारीच्या पैशांवरून वाद झाल्याने जैन याचीही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.विठ्ठल नाकाडे, जयसिंग ऊर्फ राजा मधु मुदलीयार, आनंद कुज, वीरेंद्र कदम, अंकुश सीतापुरे अशी या आरोपींची नावे असून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुमित जैन आणि आमिर अन्वर खानजादा अशी हत्या झालेल्या दलालांची नावे आहेत. हे दोघेही २१ ऑगस्ट रोजी नेरुळ येथून बेपत्ता झाले होते. त्यापैकी सुमित याचा मृतदेह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत खोपोली नजीक आढळला होता. मात्र खानजादा याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे, पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि परिमंडळ एक पोलीस यांची एकूण आठ तपास पथके तयार करण्यात आली होती.मृत सुमित आणि आरोपी विठ्ठल यांनी पाली येथे एका मृत व्यक्तीच्या नावे असलेली साडेतीन एकर जमीन कागदपत्रांचे फेरफार करून बळकावली आणि तिचा व्यवहार केला. या व्यवहारातील पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात तसेच आमिर यांच्यात वाद होते. त्यामुळे आमिर याचा काटा काढण्याचा कट सुमित आणि विठ्ठल यांनी रचला. तसेच आनंद याला हत्येसाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी खोपोली येथील जमीन व्यवहार बैठकीचे कारण देत सुमित याने आमिरला आपल्या सोबत घेतले. यावेळी कारमध्ये असलेले आनंद आणि जयसिंग यांनी आमिर याची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्याचा मृतदेह कर्नाळा येथे टाकला.आधी ठरल्याप्रमाणे, कारवर हल्ला झाल्याचे भासवण्यासाठी सुमित याने स्वत:च्या पायावर गोळी झाडून घेतली. मात्र, त्यानंतर आरोपी आणि सुमित यांच्यात सुपारीच्या पैशावरून वाद झाले आणि त्यांनी सुमितवर धारदार शस्त्राने वार केले. यात अतिरक्तस्रावामुळे सुमित याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पेण-खोपोली मार्गावर टाकून आरोपी पसार झाले, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे विठ्ठल या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून हत्येचा उलगडा झाला. त्यानंतर अन्य आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कर्नाळा अभयारण्य परिसरात फेकलेला अन्वर याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments