रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्हा उदयोगाचे हब म्हणून विकसित असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.
कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमांस यावेळी खासदार सुनिल तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, प्रांताधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड, कार्यकारी अभियंता महेश नामदे, कार्यकारी अभियंता, सा.बां.अलिबाग जगदिश सुखदेवे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते…
यावेळी बोलताना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कोकणाचा सर्वांगीण विकास आमच्या शासनाचा मुख्य धोरण आहे. रायगड जिल्ह्यात विविध विकास कामे वेगाने सुरु असून अनेकविध प्रकल्प येऊ घातले आहे.
पनवेलमध्ये ८३ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प येणार आहे. तसेच दिघी पोर्टला उद्योग सिटी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईला मोठे एक्सिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे.
कोकणातील सर्व रेल्वे स्थानक अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त करण्यात येणार आहे. यासाठी एम आय डी सी मार्फत पुढाकार घेण्यात येणार आहे. या अंतर्गत रत्नागिरी रेल्वे थानक विकसित करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यातील एक स्थानक या माध्यमातून विकसित करण्यात येईल असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले…
यावेळी खा. सुनिल तटकरे,खा. धैर्यशील पाटील, आ. भरत गोगावले यांची भाषणे झाली….