महाडच्या मनसे पदाधिकारी हल्ला प्रकरणाला आता नवं वळण… मनसेची मंत्री भरत गोगावलेंच्या पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

महाड शहरात मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर 4 नोव्हेंबरला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. मनसेकडून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे यांनी विकास गोगावलेचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्यासाठी महाड पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. सध्या या प्रकरणात शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे आणि आणखी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे मनसेत नाराजी वाढली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निषेध नोंदवला. सांगळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की हा हल्ला पूर्वनियोजित कट होता आणि विकास गोगावलेवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करावा. मनसेने इशारा दिला आहे की जर आरोपींना 8 नोव्हेंबरपर्यंत अटक झाली नाही, तर 10 नोव्हेंबरला महाड बंद ठेवला जाईल.मुंबई आणि ठाण्यातून मनसैनिक महाडमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता या प्रकरणात पोलिसांची भूमिका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घडतं,याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.