पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला.सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले. ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला होता. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर पाच मिनिटांतच कोसळले. प्रचंड धुके असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती घटनास्थळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्यामुळे आतमध्ये असणाऱ्या मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती. हे मृतदेह आता ससून रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.