पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या कासमाल, व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाणारा पेण-बोरगाव रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला असून रस्त्यावरील डांबर, खडी अक्षरशः वाहून गेली आहे. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी पेण-बोरगांव रस्त्याची पेण नगरपरिषद आणि बोरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र ती मलमपट्टीही गणेशोत्सव विसर्जनानंतर झालेल्या पावसात वाहून गेली, आणि हा रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना छोट्या छोट्या तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले असून, त्यातून मार्ग काढताना शेकडो विद्यार्थी, प्रवासी वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. यामुळे अपघाताची दात शक्यता वाढली आहे. या भागात अनेक आदिवासी वाड्या पण आहेत.
बोरगांव हे ठिकाण आणि हा रस्ता सततच्या वर्दळीचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्यांच्या चक्रात अडकला आहे. मोठमोठ्या या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे रस्त्याचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आपटतात. यातील चिखलाचे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडाले, तर वादाचे प्रसंगही उद्भवतात. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी बेहाल झाले आहेत.
पेण-बोरगांव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत अनेकदा जिल्हा परिषद बांधकाम विभाग, संबंधित ग्रामपंचायत आणि पेण नगरपरिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागकडून हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्याला निधि आलेला आहे असे सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्षात या निधिचा वापर होताना दिसत नाही. आता येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मग या रस्त्यासाठी आलेला निधी कधी वापरणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
पेण नगरपरिषदेतर्फे पेणमधील विविध ठिकाणच्या रस्त्याची कामे सुरु झाली आहेत मात्र शहरात येणारा बोरगांव रस्त्याचा काही भाग अजुनही उपेक्षितच राहिला आहे. याबाबत नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. बोरगांव रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या जनतेकडून या रस्त्याचे लवकरात लवकर नुतनीकरण अथवा दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.