मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे…मुंबईत तर प्रचंड घडामोडी घडत आहेत…प्रत्येक पक्ष बेरजेचे गणित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचे आश्वासन दिले होते…यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारंसघातून लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील गीता गवळी होत्या. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी पदाधिकारी देखील इच्छुक आहेत…अरुण गवळी सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण गवळी 2007 पासून अटकेत आहे. अरुण गवळी गेल्या 17 वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यामुळे अनेकदा अरुण गवळी याची जेलमधून सुटका करण्यात येईल, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. लोकसभा निवडणुकीवेळी देखील तशी चर्चा समोर आली होती. लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी महायुतीने अरुण गवळी याची जेलमधून सुटका करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. पण तसे काही घडले नाही.दरम्यान, अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. लालबाग, परळ, करीरोड, भायखळा, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरुण गवळीचा मोठा चाहता वर्ग आहे. या परिसरात सर्वसामान्यांमध्ये अरुण गवळी याच्याविषयी आदर आहे…त्यामुळे राजकीय पक्षांकडून अरुण गवळी याच्या नावाचा किंवा त्याच्या कुटुंबियांची मदत घेण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केला जातो. अरुण गवळी याने स्वत: 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचा पराभव झाला होता. पण त्याला 92 हजार मते मिळाली होती. याशिवाय अरुण गवळीचा अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष आहे. याच पक्षाचे मुंबई महापालिकेत नगरसेवकही निवडून येतात. त्यामुळे या मतांचा विचार प्रत्येक पक्षांकडून केला जातो.