मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी समोर आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्याची बातमी समोर येत आहे. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीतून काही सकारात्मक निर्णय न आल्याने या सत्ताधारी आमदारांनी जीव धोक्यात घालून मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर मंत्रालय परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. तर यादरम्यानच नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात दाखल झाली होती. तर पोलिसांनी या सर्व आमदारांना सुखरूप बाहेर काढले. मात्र आमदारांना बाहेर काढल्यानंतरही त्यांचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु आहे.या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.