नांदेड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. सध्या या योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून धुमधडाक्यात प्रचार केला जात आहे. काल म्हणजेच रविवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात जिल्हाभरातून हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम सुरु असताना यातील एक महिला अचानक चक्कर येऊन पडली.तिला नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला. शांता मोरे (वय ५३) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून त्या भनगी गावातील रहिवासी होत्या. लाडकी बहीण कार्यक्रमात ९ तास ताटकळत ठेवण्यात आले…याशिवाय पाणी आणि जेवणही मिळाले नाही…त्यामुळेच शांता याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे…
मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडपासून हाकेच्या अंतरावर भनगी गाव आहे…या गावातील जवळपास ५० हून अधिक महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या…यामध्ये शांताबाई मोरे यांचाही समावेश होता…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला येणार असल्याने आयोजकांनी सकाळी १० वाजताच महिलांना कार्यक्रमास्थळी बोलावले होते… परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम खूप उशिरा म्हणजेच सायंकाळी ५ वाजता सुरु झाला…त्यातच रविवारी नांदेडमध्ये प्रचंड ऊन तापत होते. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत होत्या…अशातच पिण्याला पुरेसे पाणी आणि पोटात अन्न नसल्यामुळे शांताबाई मोरे यांना अचानक त्रास होऊ लागला… छातीत वेदना सुरु झाल्याने त्या चक्कर येऊ पडल्या…नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना शांताबाई यांची प्राणज्योत मालवली… दरम्यान, आयोजकांनी तब्बल ९ तास ताटकळत ठेवल्याने शांताबाई यांनी काहीही खाल्ले नाही… त्यांना पिण्यासाठी पाणीही नव्हते म्हणून त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात शांताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे…