खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगळवारी हजारों समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे सादर केला.कर्जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला अभिवादन करीत आ. महेंद्र थोरवे यांच्या रॅलीला सुरूवात करण्यात आली. यानंतर श्रीराम पुलाजवळील उल्हास नदी तीरावरील भव्य विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर पुढे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करीत रॅली प्रशासकीय भवन येथे पोहचली.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर, भाजपचे वसंत भोईर, दीपक बेहरे हे महायुतीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक महेंद्र थोरवे समर्थक तथा शिवसैनिक आणि कार्यकर्ते रॅलीत सामील झाले होते. मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे…गळ्यात भगवे मफलर…शिवसेनेची निशाणी असलेले धनुष्यबाणाची चिन्हे, फलक, बॅनर घेत समर्थक दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भगवा व धनुष्यमय झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह दिसून आला. यावेळी कार्यकर्त्यांनी थोरवे, शिवसेना व महायुतीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत सर्व परिसर दणाणून सोडला होता.