नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत शहरातील आनंदनगर येथील पत्रकार प्रथमेश हौशीराम कुडेकर आणि त्यांचा मित्र मयुर रणदिवे यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता शेतकी फार्मसमोर घडला.कुडेकर आणि रणदिवे स्कूटरने (MH-46-AY-6850) घरी जात असताना, चार इसमांनी हात दाखवून थांबवले. त्यानंतर त्यांना स्कूटरवरून खाली पाडून हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींपैकी एकाने हातामध्ये ‘फायटर’ घालून मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी राखाडी रंगाच्या वॅगन-आर कारमधून पसार झाले. फिर्यादी प्रथमेश कुडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलिसांनी गुन्हा क्रमांक १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १८९(६), १९०, १९१(२), १९१(३) सह ६१(२) अंतर्गत दाखल केला.प्रथमेश कुडेकर हे व्यवसायाने पत्रकार असून ते साप्ताहिक ‘रायगडचे वादळ’ चे कार्यकारी संपादक आहेत तसेच ‘कर्जत सुपर फास्ट’ ही युट्यूब वृत्तवाहिनी चालवतात. त्यामुळे घटनेनंतर पत्रकार संघटना व सामाजिक संस्थांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या व पोलिसांकडे निवेदन देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी मा. आँचल दलाल (पोलीस अधीक्षक, रायगड), मा. अभिजीत शिवथरे (अपर पोलीस अधीक्षक) आणि मा. राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली.पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. तपासात कर्जत व महाड परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. न्यायालयाने अटक आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असून, हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल व वॅगन-आर कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पो.नि. भोसले यांच्यासोबत सपोनि. राहूल वरोटे, पोसई सुशांत वरक, पोसई किरण नवले, पोहवा स्वप्नील येरुणकर, पोहवा समीर भोईर, पोना प्रविण भालेराव, पोकों विठ्ठल घावस आणि पोहवा सागर शेवते यांचा समावेश होता.या यशस्वी तपासाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्जत पोलिसांचे अभिनंदन केले आहे.