माणगाव एसबीआय बँकेत ७८ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा… तिरंग्याच्या शानाने उजळला देशभक्तीचा जल्लोष…

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

माणगावातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत ७८ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या रंगात, उत्साहाच्या लहरीत आणि स्नेहाच्या वातावरणात अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्यात आला. शुक्रवारी, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अचूक ७.३० वाजता शाखा व्यवस्थापक सुशील भस्मे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आणि क्षणातच संपूर्ण परिसर “भारत माता की जय” व “वंदे मातरम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ सुरक्षा प्रमुखांनी दिलेल्या सलामीने झाली. त्यानंतर विधिवत पूजन, नारळ अर्पण व पुष्पवृष्टी करत तिरंग्याला मानाचा मुजरा देण्यात आला. सर्व कर्मचारी व सुरक्षा रक्षक, जे माजी सैनिक आहेत, यांनी राष्ट्रगीत मोठ्या उत्साहात गायले. देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि एकात्मतेची भावना अधोरेखित झाली.

या सोहळ्याचे खरे आकर्षण म्हणजे बँकेच्या आत व बाहेर केलेली रंगीबेरंगी सजावट. तिरंगी बलून, रांगोळ्या, फुलांची आरास व प्रकाशमाळांनी सजलेली शाखा देशभक्तीचा सण उजळून टाकत होती. उपस्थित ग्राहक, नागरिक व कर्मचाऱ्यांनी या सजावटीचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, पूर्वसंध्येला शाखेने एक आगळा-वेगळा उपक्रम राबवत दिवसभर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना तिरंगा ध्वज व मिठाईचे वाटप केले. ग्राहकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत एसबीआय बँकेच्या देशभक्तीपर उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी व्यवस्थापक सुशील साहेब यांनी भाषण करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “आपल्या सेवेतून आपण राष्ट्राच्या आर्थिक बळकटीस हातभार लावू शकतो. वित्तीय क्षेत्राचा विकास हा थेट राष्ट्रनिर्मितीशी जोडलेला आहे. चला, आपण सर्व मिळून हे कर्तव्य पार पाडूया,” असे ते आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हणाले.

कार्यक्रमाचा समारोप सर्व कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव, एकात्मता आणि देशभक्तीची भावना जागवून झाला. अशा प्रकारे माणगाव एसबीआय शाखेत ७८ वा स्वातंत्र्यदिन हा फक्त एक उत्सव न राहता, देशप्रेमाचा जल्लोष ठरला.