रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महागाईचा भस्मासुर, महिलांवरील वाढते अत्याचार आणि राज्याच्या हक्काचे प्रकल्प गुजरातच्या घशात घालणाऱ्या खोकेबाज महायुतीचा पुन्हा एकदा अनपेक्षित विजय झाला. लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच विजयाची पताका फडकवेल, असा माहोल सर्वत्र होता. त्यामुळे हादरलेल्या भाजप-शिंद्यांनी या निवडणुकीत अक्षरशः पाण्यासारखा पैसा वाटल्याची चर्चा होती. ठिकठिकाणी नाकाबंदीत कोट्यवधी रूपयांचे घबाड पकडण्यात आले. तोच निकाल आज मतपेटीतून बाहेर आला. मात्र शेकापच्या दगाबाजीमुळे पेण,पनवेल,उरणमध्ये भाजपचा विजय झाल्याचे बोलले जात आहे…महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील यांना अलिबागमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला… इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर अलिबाग मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकदिलाने शेकापचे काम केले… असे असताना शेतकरी कामगार पक्षाने पेणमधून अतुल म्हात्रे,पनवेलमधून बाळाराम पाटील,उरणमधून प्रीतम म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले… महाविकास आघाडीचा धर्म जयंत पाटील यांनी पाळला नाही…त्यामुळे पेणमध्ये शिवसेनेचे प्रसाद भोईर व उरणमध्ये मनोहरशेठ भोईर यांचा पराजय होऊन भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील,महेश बालदी यांचा विजय झाला… शेकापच्या दगाबाजीमुळेच भाजपचा विजय सुकर झाल्याची टीका रायगडकरांनी केली आहे…