पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
मुंबई-गोवा महामार्ग व रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसविले असून सोमवार 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते सदर सीसीटीव्ही कॅमेरांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी संस्थाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, प्रांताधिकारी प्रवीण पवार, नॅशनल हायवे अभियंता यशवंत घोटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश शरद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर हे दिवस असो वा रात्र असो नेहमीच अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून मदत करत असतात तसेच आपत्कालीन परिस्थिती सुद्धा लोकसेवा करत असतात.आता गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसविण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.