रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे तिन्ही ठिकाणचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे यांनी केल्याचा आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. तटकरे यांनी महायुतीशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे…विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनीच सुधाकर घारे यांना विरोधात उभे केल्याचे आ.थोरवे ठामपणे सांगत आहेत. तटकरे यांच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादीचे संपूर्ण युनिट अपक्षासोबत जाणे अशक्य असल्याचे थोरवे यांचे म्हणने आहे. आ. महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील अटीतटीचा सामना विधानसभेला पहायला मिळाला…शेवटच्या काही पेट्यांमधून थोरवे यांनी घारेंना मागे टाकले आणि विजयाचा ध्वज फडकावला…निवडून आल्यानंतर थोरवे यांनी सर्वप्रथम तटकरेंवर निशाणा साधताना हा तटकरेंचाच पराभव असल्याचे म्हटले होते…परवा एका खाजगी वाहिनीसोबत बोलताना,आ. महेंद्र थोरवे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचे काम केले नाही, असे सांगतानाच तटकरे त्यांनी महायुतीशी गद्दारी केल्याचा आरोप आ. थोरवे यांनी केला आहे. राज्यात महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी एकत्र काम केले.सुनील तटकरे यांनी जाणीवपूर्वक विरोधात काम केले. असे असले तरी महायुतीत वादाची ठिणगी पडणार नाही…सर्व नेत्यांना परिस्थिती माहिती असून ते सक्षम असल्याचे थोरवे यांनी म्हटले आहे. जी चूक उध्दव ठाकरेंनी केली होती ती शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब करणार नाहीत. शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या एक आमदार आहेत…त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्याचा संबंधच येत नाही…
सुनील तटकरे यांनी जर गद्दारी केली आहे तर त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल उपस्थित करत,थोरवे यांनी तटकरेंना पालकमंत्री पद मिळू नये,अशी जाहीर मागणी मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचे नेते भरत गोगावने यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर तेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, अशी भावना आ. थोरवे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, आ. थोरवे यांच्या या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.क्षुल्लक माणसाच्या प्रतिक्रियेपुढे काय बोलायचे? सोडून द्या तुम्ही त्यांना…त्यांच्या प्रतिक्रियेची फार दखल घेण्याची गरज नाही. मुळात ते प्रतिक्रिया देण्यास पात्र नाहीत. आम्ही सगळे अभेद्य आहोत. कुणी काही वक्तव्य केल्यामुळे महायुतीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते खा.सुनील तटकरे यांनी टीव्ही माध्यमांकडे व्यक्त केली आहे…