पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बंध आणले गेले आहेत…मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांमुळे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकासकांना उपाययोजना राबविण्यास सांगितले आहे. मात्र या उपाययोजना विकासकांकडून धाब्यावर बसवल्या जात असल्याचे समोर आले आहे. खारघरमध्ये बांधकामांमुळे प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे…खारघर शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक सेक्टरमध्ये बांधकाम सुरू असल्यामुळे हवेत कायम धूळ असते. बांधकाम व्यावसायिकांना महानगरपालिकेने तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली दिली आहे, नियमावलीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम दिला जातो. परंतु हा दम हवेतच विरत असल्याचे दिसून येत आहे. बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण, हवेत विरघळणारी विषारी रसायने इत्यादी घटकांमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे.
विकासकांवर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय प्रदूषणावर नियंत्रण येणार नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकामाभोवती १८ मीटर उंचीची हिरव्या रंगाची जाळी बसवणे, हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचे तुषार उडवणे, अपेक्षित आहे. परंतु कोणीही या नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप खारघर मंडल भाजप उपाध्यक्ष किरण पाटील, माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी केला आहे. पालिकेचा बांधकामांवर कुठलाही अंकुश नसल्यामुळे विकासकांचे फावले असल्याचे बोलले जात आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिलेल्या निवेदनात अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग अधिकारी वातानुकूलित दालनात दिवसभर बसून असतात, असे निवेदनात म्हटले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना धुळीचे व हवेचे प्रदूषण कसे दिसेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. नियम न पाळता बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करून बांधकाम थांबवावे, अशी मागणी केली आहे.