रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे…मात्र रायगड जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेत नाही, तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाही धोरण राबवत असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने रविवार दि.15 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट देऊन विभागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगर लगत सुरू असलेल्या कामकाजा विरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी आंबेडकर यांनी 40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र , शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिध्दार्थनगर गावातून केली…यावेळी रिलायन्सच्या नवप्रकल्पाची जागा,बेसुमार केलेली वृक्षतोड, शेतकऱ्यांचे पूर्वापार वहीवाटीचे मार्ग, संरक्षण भिंत बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा,बौद्धवाडीची पाण्याची टाकी ,स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली. रिलायन्स समूहाने स्थानिक, भूमीपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये. अन्यथा स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी भविष्यात राज्यव्यापी जन आंदोलन उभे करू असा गर्भित इशारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला दिला. दरम्यान आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली. शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांच्या समस्या आंबेडकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच उपोषकर्ते योगेश अडसुळे यांच्या कुटुंबियांची देखील आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली व सर्व शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभा करू अशी ग्वाही दिली. बेणसे सिध्दार्थ नगर गावावर जर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे असेही आनंदराज आंबेडकर यांनी ठणकावले. यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले की रिलायन्स ने प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक , भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष नागरिकांत खदखदत आहे. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनी कडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन सेना पाठिंबा देत आहे. रिलायन्सने नव्याने प्रकल्प उभारत असताना यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेतली नाही, स्थानिक जनतेला विश्वासात घेतले गेले नाही. प्रकल्पाचे फायदे तोटे जनतेला सांगितले नाहीत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, मात्र येथील शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणारे रस्ते अडविले जात आहेत. गुरचरण क्षेत्र अडविले जात आहेत. गावकऱ्यांचे वहिवाट तसेच पूर्वापार रहदारीचे रस्ते अडविण्यात आले आहेत. मुलांचे खेळाचे मैदान संपविले आहे. येथील स्मशानभूमीचे प्रश्न प्रलंबित आहेत. केमिकल युक्त पाणी नद्यांत सोडल्याने जल प्रदूषण होऊन कोळी बांधवांचा मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे. दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका व अग्निशमन बंब येणार नाही असा रस्ता देखील दिला जात नाही, येत्या काळात कुणीही शेतकरी प्रकल्पाला जागा देणार नाहीत. स्थानिकांचे इतके गहन प्रश्न उभे असताना रिलायन्स कंपनी मात्र बेणसे सिद्धार्थ नगर गावाला कोंडवाड्यात टाकणारी 30 फुटी भिंत बांधण्याची जबरी घाई करीत आहे. या गावाला हवा पाणी यापासून रोखायचे असा दृष्ट डाव इथे टाकला आहे, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याचा आम्ही निषेध करतोय. या भागात पर्यावरण धोरणाला अनुसरून असलेले कायदे मोडून मोठी वृक्षतोड केलेली आहे,प्रदूषणाचा विळखा या विभागाला बसणार आहे. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. येथील जमिनी एम आय डी सीने आयपीएल साठी घेतल्या होत्या, त्यानंतर आयपीएल कडून रिलायन्स कडे हस्तांतरण झाले . येथील जमिनी केवळ ताब्यात घेतल्या मात्र या जमिनी कित्येक वर्षे पडीक होत्या. 40 वर्षात येथे कोणताही प्रकल्प उभा राहिला नाही, येथील शेतकरी, सुशिक्षित बरोजगार यांना कोणताही रोजगार उपलब्द झाला नाही अशी परिस्थिती दिसून येते. नियमानुसार 30 वर्षाहून अधिक काळ पडीक राहिलेल्या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा परत देण्यात याव्यात, जेणेकरुन त्यांचा उदरनिर्वाह त्या शेतजमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून निर्माण होईल, आमचा पुढचा लढा शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्यासाठीचा असेल. असे आव्हान आंबेडकर यांनी या भेटीत दिले…खाजगी करणामुळे या स्वतंत्र देशात येथील नागरिकांना गुलाम गिरीच्या खाईत जावे लागत आहे. येथील जनतेवर प्रचंड अन्याय होत आहे. स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक , प्रांताधिकारी, तहसीलदार, रिलायन्स व्यवस्थापन यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते लक्ष्मण भगत, सीताराम कांबळे, बेणसे झोतिरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त बाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, नथुराम गायकवाड, नरेश गायकवाड, माजी सरपंच आ.का.म्हात्रें, माजी सरपंच सौ. स्मिता कुथे, माजी सरपंच सोनम पाटील, माजी सरपंच सौ. ज्योती तरे, वरुणा तरे, दीपिका तरे, सरिता पाटील, कल्पना अडसुळे, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड, वैभव केदारी, संजय पवार, शांताराम गायकवाड, ऍड प्रकाश कांबळे, बबन झेंडे, मनोहर शिंदे, विजय शिर्के, योगेश अडसुळे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ , शेतकरी, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.