रायगड जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले…एक मतदारसंघ,अनेक अपेक्षा आश्वासनांची पूर्तता करणार का ?…

0
46

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

रायगड जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले आहेत…आदिती तटकरे यांना पुन्हा महिला आणि बालविकास मंत्रीपद आणि भरत गोगावले यांच्या गळ्यात प्रथमच मंत्रीपदाची माळ पडून रोजगार हमी हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. कधी नव्हे ते दोन मंत्री मिळाल्याने रायगडच्या विकासाचा महादरवाजा उघडल्याची चर्चा आहे…असे असले तरी या दोन आमदारांमध्ये एक सामायिक धागा आहे…दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात माणगाव तालुक्याचा समावेश असल्यामुळे माणगावकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही…आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या मतदारसंघात माणगाव तालुक्यातील माणगाव नगरपंचायत, इंदापूर, मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघातील 25 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर भरत गोगावले महाड-पोलादपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात माणगाव तालुक्यातील लोणेरे, निजामपूर तसेच गोरेगाव या रायगड जिल्हा परिषद मतदारसंघातील 50 ग्रामपंचायतींचा समावेश आहे… म्हणजेच दोन्ही मंत्र्यांना जोडणारा दुवा माणगाव तालुका असल्याने कधी नव्हे ते माणगाव तालुक्याचे महत्त्व वाढले आहे.दीड दशकापासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे, ही माणगाव तालुक्याची मुख्य मागणी आहे. माणगाव तालुका महामार्गालत असल्याने या रखडलेल्या रस्त्याचा सर्वाधिक त्रास तालुक्यातील लोकांना होत आहे. वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य, अपघात यामुळे माणगावकरांचा संताप आता अनावर झाला आहे. कारण 17 वर्षांपासून ते हा त्रास सहन करत आहेत…श्रीवर्धन, तळा, म्हसळा, तळा, महाड, पोलादपूर आणि माणगाव हे तालुके समृद्ध करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून धरण बांधायला हवे. तसे केल्यास शेतकऱ्यांच्या दुबार शेतीचा मार्ग मोकळा होईल आणि जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध होईल…काळ नदीवरील बंधारा बांधणे, बायपास विळे पूर्ण करणे, भागाड औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राचा विकास ही निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणे.एसटी हे ग्रामीण जनतेसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे. यासाठी माणगावच्या स्थानकाने नूतनीकरण गरजेचे आहे. शिवाय ट्रॉमा सेंटरसह सुसज्ज अद्ययावत रुग्णालयाची इथे नितांत गरज आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक कराव्यात, मुख्य म्हणजे माणगावला आरटीओ कार्यालय व्हावे, खेळाडूंसाठी विभागीय स्टेडियम बांधावे, या सामान्यांच्या अपेक्षा आहेत. शिवाय सांस्कृतिक विकासासाठी नाट्यगृह बांधा, अशी मागणी माणगावकर करत आहेत.