कलेचा,विचारांचा,परंपरेचा करंजाडे महोत्सव २०२४…महोत्सवाला पनवेल,नवी मुंबई परिसरातील उत्सवप्रेमींची हजेरी…

0
35

करंजाडे शिवसत्ता टाइम्स (कुंदा म्हात्रे ) :-

रसिक आणि खवय्यांसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘करंजाडे महोत्सव २०२४’चे शनिवारी सायंकाळी थाटात उद्घाटन झाले. करंजाडे सामाजिक, शैक्षणिक आणि सांकृतिक विकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव करंजाडे सेक्टर- चार येथे रंगला आहे…पहिल्याच दिवशी करंजाडेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला करंजाडे, पनवेल, नवी मुंबई रायगड परिसरातील एक लाखांपेक्षा जास्त उत्सवप्रेमी भेट देणार असल्याचे आयोजक करंजाडे ग्रापंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे व उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांनी सांगितले…
करंजाडे महोत्सव २०२४ या महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उ‌द्घाटन शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शेकाप नेते काशिनाथ पाटील यांच्यासह सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रांतील पदाधिकारी आणि करंजाडेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उ‌द्घाटन कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली. करंजाडे ही बहुभाषिक वसाहत असल्याने येथील कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले. महोत्सवात लहान मुलांसाठी मिकी माऊस, डोरेमॉन, अँग्री बर्डस अशा कार्टून्सचे विश्व उभारले आहे.महोत्सवाच्या निमित्ताने मिसेस आणि मिस्टर करंजाडेकर स्पर्धा घेण्यात येणार आहे. महिलांसाठी पैठणी खेळ, होम मिनिस्टर, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा, त्याचबरोबर लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्यांबरोबर पाळण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या महोत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.