उघड्यावरील शोर्मा खाल्याने ४१ जणांना विषबाधेची घटना… उघड्यावरील अन्न पदार्थ न खाण्याचे डॉ.गिरीश गुणेंचे आवाहन…

0
60

 उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-

दिघोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने अनेकांना पोटात मळमळणे, दुखणे, उलट्या, जुलाब सारखं वाटत असल्याने पनवेल येथील गुणे रुग्णालयात ८ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत… तसेच मंगळवारी दि.३१ डिसेंबर रोजी एका शोरमा बाधित रुग्णाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे…सध्या त्या रुग्णांची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी देतातच कशी असा सवाल डॉ.गिरीश गुणे यांनी उपस्थित करुन लहान मुलांनी, नागरिकांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत असे आवाहनही डॉ.गिरीश गुणे यांनी केले आहे…

दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने दिघोडे व इतर गावातील एकूण ४१ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी दि.२९ रोजी घडली होती…सदर रुग्णांनी तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक रुग्णालय गाठून रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांच्याकडून प्रथम उपचार करून घेतले… त्यातील काही रुग्णांना उलट्या, जुलाब,इतर आजार उद्भवताच त्या रुग्णांनी पनवेल येथील गुणे रुग्णालयात, कोप्रोली येथील सिद्धिविनायक रुग्णालयात आणि उरण येथील पालवी रुग्णालयात तसेच इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धाव घेतली…या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नागरिकांमध्ये घबराटाचे वातावरण निर्माण झाले… तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शोरमा बाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे…

एकंदरीत डॉ.प्रकाश मेहता,डॉ.गिरीश गुणे,डॉ.सिध्दराम अवंती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे तसेच परिचारिका कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे शोरमा बाधित रुग्णांचे प्राण वाचले असले तरी अन्न व औषध विभाग प्रशासन,पोलीस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील गावा गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे…