एकेकाळी घराघरांत भावनांचा सेतू… आजपासून लाल पेटी कायमची बंद…

0
6

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

भारताच्या संवाद इतिहासातील एक निःशब्द पण जिव्हाळ्याचा अध्याय आज संपुष्टात आला. रस्त्याच्या कडेला, बाजाराच्या गजबजाटात, गावच्या चौकात, सरकारी कार्यालयांसमोर उभी दिसणारी लाल पोस्ट पेटी – आजपासून कायमची दिसणार नाही.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे देशभरात खळबळ माजली. भारतीय टपाल खात्याने सर्व लाल पोस्ट बॉक्स हटवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली. भावनिक पोस्ट्स, आठवणींनी भरलेल्या “गुड मॉर्निंग”च्या शुभेच्छा – १ सप्टेंबरच्या या सकाळी लोकांनी लाल पेटीला निरोप देत शेअर केल्या.

या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी माणगाव पोस्ट ऑफिसला भेट दिली. मात्र तेथील पोस्ट मास्टर रजेवर होते. सहाय्यक अधिकाऱ्यांशी संवाद साधत सांगितले की अद्याप कोणतेही लेखी परिपत्रक मिळालेले नाही. मात्र अलीबाग मुख्य कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक त्यांनी दिला.

अलीबाग कार्यालयाशी संपर्क साधल्यावर तेथील अधिकारीही रजेवर होते; पण त्यांनीही प्रामाणिकपणे संवाद साधला. त्यांनी कबूल केले की अधिकृत आदेश न मिळाल्यानेही तोंडी सूचना मात्र पोहोचल्या आहेत. आणि काही ठिकाणी लोकांसाठी सूचना-फ्लेक्स लावण्याचे निर्देश मिळाले आहेत.

अजून एक आश्चर्यकारक बाब उघडकीस आली ती अशी की आमच्या प्रतिनिधींना या विषयावरील पहिली सोशल मीडियावरील माहिती पाठवणारे व्यक्ती म्हणजे माणगाव पोस्टचेच एक माजी पोस्ट मास्टर ! संपर्क साधल्यावर ते थोडे भावुक झाले. “हो, खरं आहे… आजपासून लाल पोस्ट पेट्या कायमच्या बंद होत आहेत,” त्यांनी हळू आवाजात सांगितले. “सरकारी कार्यालयांसमोर, गावोगावी लटकणाऱ्या या पेट्या आजपासून इतिहासात जमा झाल्या आहेत.”

गेल्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले, “कधीकाळी या पेट्या भर भरून वहात असत  शुभेच्छा पत्रे, ग्रीटिंग कार्ड्स, प्रेमपत्रे, अर्ज… सगळं यातूनच जात असे. लोकांचा जीव ओतलेला असे या पेट्यांत.” पण जेव्हा त्यांना विचारलं. “जर या पेट्या आज काढून टाकत असतील, तर त्यांची दुरुस्ती का केली नाही?” तेव्हा ते काही बोललेच नाहीत.

खरंच, खांदाड येथील शेलार नाका पोस्ट पेटीची अवस्था बघण्यासारखी आहे. गंज लागून तिचा तळच नाहीसा होऊन गेला आहे. पत्र टाकले तर थेट जमिनीवर पडते आणि मातीमध्ये खराब होऊन जाते. ही अवस्था पाहून माजी पोस्ट मास्टर यांनी ही कबूली दिली की “ही चूक झाली की माणगाव कार्यालयाने वेळीच लक्ष दिलं नाही. मला आठवतंय, जसा बारा वर्षांपूर्वी टेलिग्राफ बंद झाला… तसंच आज लाल पेटीचं युग संपलं. मी निवृत्त झालोय, पण माझ्या कामाचा साथीदारही आज निवृत्त झाल्यासारखं वाटत.”

आमच्या प्रतिनिधींनी आज माणगावभर फिरून उभ्या असलेल्या पेट्यांचे अखेरचे फोटो घेतले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी याच पेट्यांच्या दयनीय अवस्थेवर एक लेख प्रसिद्ध केला होता. आज मात्र त्या पुन्हा दुरुस्त न होता कायमच्या हटवण्यात आल्या. दशकानुदशके या पेट्यांनी निःशब्दपणे लाखो भावनांचे ओझे वाहून नेले. आईच्या शुभेच्छा, मुलांच्या परीक्षेची पत्रं, भावांची राखी, नववधूचं पहिलं पत्र, नोकरीचे अर्ज, दिवाळीच्या ग्रीटिंग्ज… किती भावनांची अदलाबदल झाली ती याच माध्यमातून!

डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया आल्यानंतर पत्रलेखन कमी झालं हे खरं. पण रस्त्यावर उभी लाल पेटी दिसली की मनात एक समाधान येत असे कुठेतरी अजूनही पत्र पाठवता येतंय. १ सप्टेंबर २०२५ च्या सूर्यास्तानं, संपूर्ण देशानं या लाल पेट्यांना अखेरचा निरोप दिला.

युग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय… पण जनतेच्या मनातल्या आठवणी मात्र कायम राहतील. आणि जशा त्या माजी पोस्ट मास्टरांनी भावुक शब्दांत सांगितलं… “लाल पेटी गंजून जाईल, पण तिने जपलेल्या आठवणी कधीच मावळणार नाहीत.”