चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर तालुक्यातील वावंढळ या गावी, ६६ वर्षांपूर्वी कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून जांब्रुक तालुका जावळी जिल्हा सातारा येथून हे गाव स्थलांतरित होऊन स्वखर्चाने वसले आहे, या गावचे शिल्पकार आणि भाग्यविधाते कै.जयसिंगराव राजबाराव तथा जे आर कदम यांनी सुनियोजित वसाहत वसवली आहे. रायगड जिल्ह्यात एक आदर्श वसाहत म्हणून पाहिले जाते.जांब्रुक गावची असलेली रूढी परंपरा सामाजिक उपक्रम आजही ६६ वर्षानंतर कायम आहेत. होळी,नवरात्र आणि गौरी गणपती यांचे उत्सव साजरे करताना जुन्या गावची प्रथा, चालीरीती यानुसार चालत असून आजही गौरी पूजनाच्या दिवशी ग्राम दैवत आई श्री जानाई व आई श्री इंजाई या दोन देवी दोन मानाचे मानकरी यांच्या घरी येतात, या दोन्ही घरी जाताना संपूर्ण ग्रामस्थ देव घेऊन मानकरी यांच्या घरी जातात, आई श्री जानाई देवी ही गौरी गणपती सोबत विराजमान होतात, तर आई श्री इंजाई ही घरच्या कुळदैवत बरोबर देव्हाऱ्यात बसतात, त्यांची पूजा झाल्यावर गावातील घरांत गौरी पूजन होते, नव विवाहित वधू प्रथम या दोन्ही घरी येऊन देवीला आणि गौरीला ओवाळतात. त्या नंतर घरोघरी ओवसा व पूजा होते. ही प्रथा चालीरीती फार पूर्वी पासून म्हणजे जुने गाव जांब्रुक इथूनच सुरू आहे, पूजनाच्या दिवशी रात्री दोन्ही घरी गौरी जागवल्या जातात,यावेळी पुरुष मंडळी भजन आणि महिला गौरी नाच, झिम्मा फुगडी खेळतात. निरोपाच्या दिवशी पुन्हा दोन्ही देवी मंदिरात स्थानापन्न होतात.