पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न जेएसडब्ल्यू कंपनी करत असून जेएसडब्ल्यू फाऊंडेशन किंवा जेएसडब्ल्यू स्टीलने केलेले कार्य हे आमचे कर्तव्यच आहे…. विद्यार्थ्यांना आणि पुढील पिढीला कौशल्यपूर्ण बनवावे, ही आमची जबाबदारीच आहे… विद्यार्थ्यांच्या कुशलतेत वाढ करावी, त्यांना सर्व प्रकारे सक्षम करावे, याच दिशेने आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जेएसडब्ल्यू कंपनी सी.एस.आर. हेड सुधीर तेलंग यांनी पेण तालुक्यातील शिर्की चाळ येथील धर्माजीशेठ नारायण पाटील विद्यालयाच्या विस्तारित बांधकामाच्या शुभारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी जेएसडब्ल्यू सी.एस.आर. हेड सुधीर तेलंग, कैलास जुईकर, किरण म्हात्रे, अनुराग पाटील, महेंद्र ठाकूर, सोसायटीचे संस्थापक सचिव हिराजी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शशिकला पाटील, समाजसेवक कमळाकर पाटील, गोवर्धन पाटील, जनार्दन पाटील, विभागातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच मुख्याध्यापक, कर्मचारीवृंद आणि सर्व शाळांचे माजी विद्यार्थी उपस्थित होते…
यावेळी विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जेएसडब्ल्यूचे सी.एस.आर. हेड सुधीर तेलंग यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले… कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग आणि दिवंगत धर्माजी नारायण पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली…
जेएसडब्ल्यू फाऊंडेशन डोलवी, पेण यांच्या सी.एस.आर. विभागातून पेण खारेपाट विभागातील शिर्की चाळ येथील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या धर्माजीशेठ नारायण पाटील शाळा इमारतीच्या विस्तारित बांधकामाचा शुभारंभ तसेच विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शशिकला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले… यावेळी शाळेच्या विस्तारित बांधकामामध्ये असलेली संरक्षक भिंत आणि पाण्याची टाकी यांचा शुभारंभ तसेच संस्थेच्या विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला…