महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
डिसेंबर महिना उजाडला की महाबळेश्वरसह कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात…यातच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली रायगड किल्ला,चवदार तळे,नरवीर तानाजी मालुसरे स्मारक पाहण्यासाठी येत असतात…न्यू हायस्कूल वरुळ, घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहल सिद्धटेक, बारामती, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे येत असताना बसमधील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली. या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले…शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तीके यांस याबद्दल विचारले असता महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच स्टिंग सारखी शीतपेय पिल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याचे सांगितले. तर महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी खिडक्या बंद केल्याने विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला असल्याचे देखील सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनू डोईफोडे, लहान मुलांचे डॉक्टर पुल्ले, डॉक्टर अनिल काकड, डॉक्टर गुठठे, डॉक्टर राजेश शिंदे यांसह पोलादपूर तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.