नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
हवामान प्रमाणानुसार देय होणारी विमा रक्कम जिल्ह्यातील अनेक बागायतदारांना यावर्षी अजून मिळालेली नाही. यासंदर्भात कोंकण भवन-दापोली येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे सोमवार दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नक्की काय निर्णय होतो आहे याकडे जिल्ह्यातील अनेक बागायतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोलीचे कार्यकारी सदस्य श्री. सुनिल दळवी या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२३-२४ करीता राज्यात राबविण्यात आली आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ अधिसुचित महसूल मंडळातील आंबा व काजू या अधिसुचित पिकांकरीता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. यांच्या मार्फत योजना राबविण्यात आली आहे.या योजनेतील मार्गदर्शक सूचनांनुसार पिकांची नुकसान भरपाई ही त्या महसूल मंडळात स्थापन करण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदविल्या जाणाऱ्या हवामान घटकांच्या तपशीलानुसार निश्चित केली जाते… लागू झालेल्या हवामान प्रमाणकानुसार (ट्रिगर) देय होणारी विमा परतावा रक्कम विमा कंपनी मार्फत बागायतदारांना अदा केली जाते.सन २०२३-२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३६८१८ लाभार्थींनी योजनेत सहभाग घेतला होता . यानंतर विमा कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार एकूण रक्कम ७९८९ कोटी रुपये विमा परताव्यापोटी विमाधारक लाभार्थींना मंजूर झालेले आहेत.परंतु यामध्ये लांजा, राजापूर, दापोली व रत्नागिरी या तालुक्यांतील काही महसूल मंडळात हवामान प्रमाणक (ट्रिगर) लागू न झाल्याने विमाधारक बागायतदारांना हा विमा परतावा मिळालेला नाही.या बागायतदारांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.याविषयी जिल्हा निहाय तक्रार निवारण समितीची विभागीय कोंकण आयुक्तालयात बागायतदारांच्या तक्रारीची चौकशी व दखल घेण्यासंदर्भात १३/१/२०२५ रोजी ही बैठक संपन्न झाली…