रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर) :-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनेगाव हद्दीतील यशवंतखार येथील ग्रामस्थांनी शिवकालीन मंदिराच्या ऐतिहासिक जागेवरील अनधिकृत तारेच्या कंपाउंडविरोधात लक्षवेधी आंदोलन केले. या मंदिराचा इतिहास सुमारे 300 ते 400 वर्षे जुना असून, गट क्रमांक 286 आणि 287 ही जागा मंदिराच्या मालकीची असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने या जागेवर अनधिकृतरित्या तारेचे कंपाउंड उभारले आहे, ज्यामुळे मंदिराचा परिसर अडवला गेला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी आणि मंदिराची मूळ जागा मोकळी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. त्यांनी प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी करत न्याय मिळवण्यासाठी एकजूट दाखवली. आंदोलनाचे नेतृत्व करताना ज्येष्ठ नेते नंदू शेठ म्हात्रे यांनी सांगितले की, “प्रशासनाने पुढील सात दिवसांत हे अनधिकृत कंपाउंड हटवावे. अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होतील.या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी ग्रामस्थांनी आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवकालीन मंदिराचा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी ग्रामस्थांच्या या आंदोलनाने स्थानिक पातळीवर मोठेच लक्ष वेधले आहे.