एनसीसीतून आदर्श नागरीक घडतात:प्रकाश संकपाळ… केएमसी महाविद्यालयाच्या प्रांगणात एनसीसी डे संपन्न… 

0
36

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-  

एनसीसी डे (NCC Day) निमित्त खोपोली येथील केएमसी महाविद्यालयात 5 महा गर्ल्स बीएन एनसीसी मुंबई ग्रुप ए (5 MAH GIRLS BN NCC MUMBAI GROUP A) च्या वतीने आज गुरूवार, 6 फेब्रुवारी 2025 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कर्जत प्रातांधिकारी (SDO) प्रकाश संकपाळ, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) विक्रम कदम, खोपोली प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पीएसआय (PSI) पूजा चव्हाण, निवासी नायब तहसिलदार (महसूल) सुधाकर राठोड, केटीएसपी मंडळाचे दिलीप पोरवाल, प्राचार्य डॉ. गायकवाड, सौ. मनीषा जनार्दन भासे, सौ. मीना महेंद्र थोरवे, कॅप्टन शितल गायकवाड आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एनसीसी कॅडेटने साकारलेल्या विविध कलाकृती पाहत प्रमुख पाहुण्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. याप्रसंगी बोलतांना प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ म्हणाले की, विविध स्तरातील मान्यवरांच्या हस्ते पाठीवर शाबासकीची थाप पडल्याने आनंद होतो, तसेच मेहनतीचे चीज झाले असे वाटते. मुलींच्या विविध गुणांना जोपासण्याचे काम कॉलेज करीत असते. शिस्तबध्दता व परिपूर्ण, आदर्श नागरीक घडविण्याचे काम एनसीसीद्वारे होत असते. व्यक्तीमत्व घडविण्याचे तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रात आपण जाऊच… कुणी शासकीय अधिकारी, कुणी क्रिडा क्षेत्रात मोठे नाव करेल, पण आदर्श नागरीक होणे खूप महत्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरडी परेडमध्ये निवड होणे, ही खरंच अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देशातून यासाठी निवड होत असते, त्यामुळे ज्यांनी यासाठी घाम गाळला आहे, त्यांनाच याचे महत्व समजेल. इतर सामान्य नागरीकांना ते समजणार नाही. आपण कोणत्याही क्षेत्रात जा, पण ज्या क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रात सर्वौत्तम होण्याचा प्रयत्न करा, असेही आवाहन प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले.

दरम्यान, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल एनसीसी कॅडेट व कैप्टन शितल गायकवाड यांचे आभार मानले. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खोपोली नगर परिषद निवडणुकीत देखील आपल्या एनसीसी कॅडेटची गरज भासेल व आपण सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे एनसीसीच्या कॅडेटला सुविधांचा अभाव आहे, तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित सौभाग्यवती आमदार भासे मॅडम  यांनी आमदार साहेबांना शब्द टाकावा. आमदार महेंद्र थोरवे हे त्यांचा शब्द मोडणार नाहीत व संगणक (computer) एनसीसी कॅडेटला मिळवून द्यावेत, असे आवाहन त्यांनी सौ. मनीषा जनार्दन भासे व सौ. मीना महेंद्र थोरवे यांना केले. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होवून यश मिळविलेल्या एनसीसी कॅडेटस् यांना सन्मानपत्र व पदक (मेडल) देवून गौरविण्यात आले. शेवटी केक कापून एनसीसी डे साजरा करण्यात आला.