श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स ( आनंद जोशी ) :-
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील संत रोहिदास हाॅलमध्ये ९ फेब्रुवारी रोजी अपंगांसाठी निःशुल्क दिव्यांग उपकरणांच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते… या दिव्यांग-उपकरण वाटप कार्यक्रमाला रायगडचे खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित होते… या कार्यक्रमात ९२ अपंग लाभार्थींना विविध साहित्यांचे वाटप केले गेले… यामध्ये तिनचाकी सायकल, मोटर ट्राय सायकल, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र, व्हील-चेअर्स, वाॅकर, अंध व्यक्तींसाठी काठी, कृत्रिम अवयव, कुबड्या इत्यादी साहित्यांचा समावेश होता… यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार तटकरे म्हणाले की, दिव्यांगांना सर्व साहित्य बनविणारी कंपनी ही भारत सरकारची आहे… सदरचे साहित्य लवकरात लवकर दिव्यांगांना उपलब्ध होण्यासाठी मी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना भेटून सतत पाठपुरावा केला… दिव्यांगांचा एखादा अवयव दुर्दैवाने कमजोर असेल तर त्यांचे अन्य अवयव प्रभावी असतात… दिव्यांगांना समाजात आदराचे स्थान मिळाले पाहिजे… हे वाटप जिल्ह्यात कुठेतरी एका गावी करता आले असते, परंतु त्यासाठी दिव्यांगांना येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, म्हणून आम्ही ते तालुक्यांच्या ठिकाणीच आयोजित केले… केंद्र सरकारच्या, ज्येष्ठांसाठी असलेल्या वयोश्री योजनेची काटेकोर अंमलबजावणीही एक महिन्याच्या कालावधीत तालुक्यात व जिल्ह्यात झाली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले…
या कार्यक्रमाला रायगडचे खा. सुनील तटकरे, श्रीवर्धनचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, शहर अध्यक्ष जितेंद्र सातनाक, उदय बापट, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रविता माने, तालुका महिला अध्यक्षा सबा फिरफिरे, शहर महिला अध्यक्षा राजसी मुरकर, दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, संघटनेचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष निलेश नाक्ती आदी पदाधिकारी उपस्थित होते…