दापोलीत श्री गजानन महाराज प्रकट-दिन सोहळ्यास आरंभ… गिम्हवणे येथे दि. १६ ते २० फेब्रुवारीपर्यंत अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

0
67

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील गजानन महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यास रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ पासून प्रारंभ झाला…गुरुवारी माघ वद्य सप्तमी शके १९४५ दिनांक २० फेब्रुवारी रोजी गजानन महाराज यांचा १४७ वा प्रकट दिन आहे…यानिमित्ताने दि. १६, १७, १८, १९ व २० फेब्रुवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे…दरम्यान रोज सकाळी अभिषेक, पुजा,आरती व संध्याकाळच्या पूजा-आरतीसह विविध धार्मिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

यामध्ये दापोली येथील श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे श्री. गजानन बेलोसे, पांगारवाडी येथील श्री मरिआई भजनी मंडळाचे श्री. संतोष भाटकर, जालगांव येथील श्री लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळाच्या श्रीमती माधुरी परांजपे व श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळाचे श्री. मंदार जाधव आणि विद्याभारती भजनी मंडळाच्या श्रीमती शेवाळे, तसेच गिम्हवणे-सुतारवाडी येथील श्री गुरुप्रसाद भजनी मंडळाचे श्री. सुशांत देवधरकर इत्यादींची सुश्राव्य भजने, तसेच पुणे येथील महिला शाहिर श्रीमती विनीता जोशी यांच्या पोवाड्याचा बहारदार कार्यक्रम याचबरोबर आंजर्ले येथील श्री. विद्याधर शास्त्री करंदीकर यांचे प्रबोधनपर प्रवचन व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन आहे.

गुरुवार, दि. २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिनी सकाळी ५.३० ते १०.०० यावेळेत काकड आरती, अभिषेक व लघुरुद्र, पालखी पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल तद्नंतर ह.भ.प. श्री. विजय निजसुरे – आंजर्ले यांचे सुश्राव्य किर्तन होऊन “झुणका-भाकर” महाप्रसाद व तद्नंतर वारकरी संगीत कार्यक्रम पश्चात् निगडे येथील ओम आदिनाथ वारकरी सांप्रदाय मंडळाचे गुरुवर्य ह.भ.प. श्री पांडुरंगबुवा रेवाळे यांच्या समवेत श्रींच्या पादुकांच्या पालखी मिरवणूकीस आरंभ होणार आहे.तद्नंतर मंत्रजागर व ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी भजनी मंडळाचे श्री. रमेश कडू यांच्या भजनानंतर हरिपाठ व प्रकट दिनाची महाआरती होऊन या सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोली आगारातर्फे श्री गजानन महाराज मंदिर, गिम्हवणे ते जालगांव दरम्यान विशेष बस-सेवांचे आयोजन करण्यात आलेले आहे…