शिवसत्ता टाइम्स चिपळूण (देवेंद्र मोरे) :-
पुण्यावरून चिपळूणला येत असतां कुंभार्ली घाटातील कातळकडा येथील अवघड वळणावरून कार ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि कार मधील दोघांचा मृत्यू घडून आला, वास्तविक हा अपघात दोन दिवसांपूर्वी रात्री घडला मात्र मोबाईल लोकेशनमुळे मंगळवारी ही घटना उघडकीस आली… विश्वजीत जगदीश खेडेकर, वय वर्षे ४०, हे आपल्या मातोश्री सुरेखा जगदीश खेडेकर, वय वर्षे ७० आणि आपल्या पत्नीसमवेत चिपळूणला काही कामानिमित्त निघाले होते. वाटेत विश्वजीत यांनी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सातारा येथे सोडले व पुढे चिपळूणच्या दिशेने निघाले असताना दरम्यान पाटण येथे त्यांनी जेवणही केले पण कुंभार्ली घाटातील कातळकडा येथील एका बिकट वळणावरून जाताना दुर्दैवाने हा अपघात घडला….
दरम्यान विश्वजीत यांच्या पत्नीने घरी पोहचल्यावर वारंवार कारमधील आपल्या सासूबाई आणि पती विश्वजीत याला मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण दोघांचाही फोनवर संपर्क न लागल्याने काहीतरी हे विपरीत घडले असावे असा संशय आल्याने त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली असता… केवळ त्यांनी केलेल्या मोबाईल फोनच्या लोकेशनमुळे अपघाताचा छडा लागला… पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांना तपासात कातळकडा येथून कार घसरत ५०० फूट खोल दरीत कोसळलेली दिसून आली… क्रेनच्या सहाय्याने कार दरीतून बाहेर काढण्यात आली मात्र कारमधील दोन्ही व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्या… यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र माने व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते…